या ठिकाणी आजी–आजोबा संमेलन सोहळा उत्साहात संपन्न

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

आजच्या आधुनिक व धावपळीच्या जीवनशैलीत नातेसंबंधातील आपुलकी दृढ करणे हे मोठे आव्हान बनले आहे. कुटुंबातील संस्कारांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य आजी आजोबा करतात. अनुभवातून, प्रेमातून आणि मार्गदर्शनातून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडतात. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल, दहागाव येथे आजी आजोबा संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

 या संमेलनात आजी–आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. विविध मनोरंजनात्मक व गमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आजी–आजोबांनी या खेळांमध्ये मनमुराद आनंद लुटत धम्माल मस्ती केली. विशेषतः संगीत खुर्ची या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हास्य, टाळ्या आणि आनंदी वातावरणात संपूर्ण कार्यक्रम अतिशय गमतीजमती च्या खेळींमध्ये पार पडला.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भास्करराव पंडागळे नाईक यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव चव्हाण, विठ्ठलराव कदम, बाबाराव कदम, मुगाजी जटाळे, सरिता देवी अग्रवाल, अशोकजी लोहिया, रमेश चव्हाण यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष दर्शन अग्रवाल, उपाध्यक्ष एन. आर. वड्डे, सचिव सपना अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून आजी–आजोबांचे समाजातील व कुटुंबातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार महाजन व दैवशाला बारे यांनी केले, तर किरण दुर्गमवार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापक आशिष लासिनकर, मुख्याध्यापक एम. पी. कदम, मुख्याध्यापिका पल्लवी पराते, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम आजी–आजोबा व नातवंडांमधील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरला.

Post a Comment

0 Comments