गो - रक्षकाची अमानुष हत्या, दोन संशयीत ताब्यात !

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड

गोवंश तस्करी रोखणाऱ्या बजरंग दलाच्या एका कट्टर कार्यकर्त्याची गोवंश तस्करांनी अमानुष आणि अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उमरखेड पासून ५ किमी अंतरावरील सुकळी (ज.) येथे शनिवारी मध्यरात्री घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे मृतकाचे नाव असून या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो पीक-अप वाहनातून (क्र. एम एच २९बीई ८९१५) गोवंशाची अत्यंत निर्दयीपणे कोंबून कत्तली साठी उमरखेडच्या दिशेने तस्करी केली जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी बिजोरा टोल नाक्यावर सापळा रचून सदर संशयास्पद वाहन अडविण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांना हुलकावणी देत तस्करांनी वाहन वेगाने पळविले. गोवंशाची तस्करी होत असल्याचे पाहून गजानन सुरोशे यांनी तातडीने आपल्या एस-क्रॉस कारने (क्र. एम एच १२ पिटी ८६३४) तस्करांच्या वाहनाचा थरारक पाठलाग सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी आपली बोलेरो सुकळी गावाच्या दिशेने वळवली.

 गजानन सुरोशे यांचे वाहन मागोमाग सुकळी गावात शिरताच, आधीच दबा धरून बसलेल्या तस्करासह त्यांच्या साथीदारांनी गजानन यांच्या गाडीला वेढा घातला. काही समजण्याच्या आतच तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या गाडीवर मोठमोठे दगड आणि लाकडी दांडक्यांनी भीषण हल्ला केला, या हल्ल्याचे अत्यंत हिंस्र आणि अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये तस्कर किती क्रूर बनले होते हे स्पष्ट दिसत आहे. नराधमांनी गाडीची पूर्ण तोडफोड करून गजानन सुरोशे यांना गाडीबाहेर ओढले आणि दगडाने अमानुषपणे ठेचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गजाननला ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेचे गांभीर्य आणि परिसरातील वाढता तणाव पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी तात्काळ मोठा फौज फाटा घेऊन घटनास्थळ गाठले. सुकळी आणि महागाव परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 हत्या करून फरार झालेल्या तस्करांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, "या नराधम दोषींना पाताळातूनही शोधून काढा आणि त्यांच्यावर 'मोक्का' अंतर्गत कठोर कारवाई करा, अन्यथा संपूर्ण जिल्हा पेटून उठेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल !" असा थेट आणि आक्रमक इशारा बजरंग दलाने प्रशासनाला दिला आहे.मयत गजानन सुरोशे यांचा भाऊ ज्ञानेश्वर मारोती सुरोशे याच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी शेख सुलतान अलावली रा.सुकळी ( ज )व इतरावर १०९ (१) १०३ (१)३ (५) अन्वये गुन्हें दाखल करण्यात आले असून आरोपींना शोधण्यासाठी हैद्राबाद, नांदेड, हिंगोली व परभणी येथे पोलिस पथक रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महागावमध्ये कडकडीत बंद, बाजारपेठ ठप्प !

बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन सुरोशे यांच्या या क्रूर हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रविवारी संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या नराधम कृत्याचा निषेध करत 'महागाव बंद'ची हाक दिली.संतप्त कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर डाऊन ठेवले. मुख्य बाजारपेठेत सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून गजानन सुरोशे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तस्करांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आता पोलिसांच्या पुढील कारवाई कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

0 Comments