पिनाकेश्वर यात्रोत्सवावर उन्हाचा परिणाम मात्र पालखी सोहळ्यास हजारो भाविक

 Bay--team aavaj marathi 


नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर क्रमांक दोनचे असलेले नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर श्री पिनाकेश्वर महादेवाचे मुख्य मंदिराच्या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार दि.२ मे चैत्र शुद्ध नवमी या मराठी तिथीला सुरुवात झाली. दरवर्षी दिवसभरात पंचवीस हजार पेक्षा अधिक भाविक आणि पर्यटक येथे येतात मात्र कधी नव्हे यावर्षी यंदा ४० ते ४१ डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात वाढ झाल्याने यंदा दिवसभरात साधारण दोन हजार भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी येथील प्रथेप्रमाणे मंदिरासमोरील ५१ फुट उंच असलेली दिपमाळ शंकर पवार आणि आप्पा शिंदे यांनी प्रज्वलित करताच, देवाच्या पिंडीवर ठेवलेला ढोलताशांच्या गजरात पितळी मुखवट्यास येथील पवित्र कुंडापर्यंत आणून तेथे स्नान घालून आरती करण्यात आली. सूर्यास्त होण्याची वेळ असल्याने देवाच्या दर्शनासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

देवाच्या मुखवट्यास येथील पवित्र कुंडामध्ये स्नान घालतांना मानकरी मंडळी


रात्रीच्या वेळी पालखी सोहळ्यासाठी झालेली गर्दी 

सायंकाळी दिपमाळ प्रज्वलित करतांना पवार आणि शिंदे 

वरील सर्व विधी आटोपल्यानंतर हा मुखवटा नवीन लाल कपड्यात पाठिवर घट्ट बांधून अनवाणी पायाने मानकरी असलेल्या शुभम पवार यांनी ७ किलोमीटर अंतर गावच्या वेशीपर्यंत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आणला, तेथून ढोलताशांच्या गजरात सवाद्य आतिषबाजी करून श्री पिनाकेश्वर भगवान की जय, हर-हर महादेवचा जयघोषात गावातील महादेवाचे मंदिरात आणला. त्यानंतर पुरातन मारुती मंदिराच्या ठिकाणी समाधीस्थळ झालेले तपस्वी सद्गुरू सुक्रूदास महाराज व मारुतीराया यांना श्री पिनाकेश्वर महादेवाचा रात्रभर होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी रितीरिवाजा नुसार निमंत्रित करण्यात आले, या सोहळ्याला दोन हजार उपस्थित होते. दर वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने जातेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिक त्याचप्रमाणे येथून नोकरी निमित्त व उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले नागरिक देवाच्या दर्शनासाठी आपापल्या गावी परतत असतात.

उन्हामुळे मंदिर परिसरात असलेली अल्प गर्दी

या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या रात्रभर अगदी भक्तीभावाने ह.भ.प. सुभाष मेहतर, बाळू काटे, बाबासाहेब शिंदे, नाना काटे, कडू पाटील, लक्ष्मण वर्पे, नंदु पवार आणि कारभारी बोडखे यांच्या नेतृत्वाखाली भजनाच्या निनादात व वाद्यांच्या गजरात प्रचंड रंगीबेरंगी आतिषबाजी विवीध प्रकारच्या फुलांनी व रोषणाई करण्यात आलेल्या देवाच्या पालखी सोहळ्यास रात्री साडे दहा वाजता ठरलेल्या पालखी मार्गाने हरहर महादेवच्या जयघोषात सुरुवात झाली. 

यावेळी ठिकठिकाणी थंड वातावरण असल्याने विस हजार पेक्षा महिलांसह अबालवृद्ध आणि स्थानिक व पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शन घेतले. ह्या पालखीची सजावट करण्यासाठी कैलास तुपे, भागिनाथ सोनार, राजेंद्र जोनवाल, गणेश गवंडर, अनिल शिंदे इत्यादी मंडळींनी परिश्रम घेतले. 

उन्हामुळे दिवसा यात्रेतील तुरळक असलेली गर्दी

शुक्रवारी सकाळी सुर्योदयाच्या सुमारास पालखी महादेवाचे समोर आल्यानंतर वेदशास्त्रसंपन्न दत्तात्रय भट यांनी विधीवत पूजन केले व महाआरती करण्यात आली. त्यानंतर पंचकमेटीच्या वतीने स्थानिक व पंचक्रोशीतील ज्या मंडळींनी विनामूल्य पालखी सोहळ्यासाठी योगदान दिले, त्या सर्वांना श्रीफळ व प्रसादाचे वितरण करुन सोहळ्याची सांगता करण्यात आली. सालाबादप्रमाणे दि.२ रोजी सुरू झालेली यात्रा शनिवार दि ४ पर्यंत म्हणजे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असते, या मध्ये भांडे, कपडे, गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, बेंटेक्स ज्वेलरी, इत्यादी शेकडो व्यवसायीकांनी आपल्या ठरलेल्या जागेवर दुकाने थाटली होती. परंतु उन्हाच्या तडाख्याने दिवसभर खरेदीदारांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजे पर्यंत सर्वांची एकच गर्दी होत होती. त्यामुळे अनेक व्यवसायीकांना तीन दिवस यात्रेसाठी थांबून अपेक्षित धंदा झाला नसल्याचे व्यवसायीकांनी खंत बोलून दाखवत दुरवरुन आलेल्या व्यवसायीकांना येण्या जाण्याचे भाडे देखील निघाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यात्रा उत्सवाचे नियोजन श्री पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपालीका व सामाजिक कार्यकर्ते यांनी केले. 

देवस्थान आणि वार्षिक यात्रोत्सवा बाबत थोडक्यात माहिती 

या भागातील थंड हवेचे ठिकाण म्हणून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व खानदेशात प्रसिद्ध असलेले समुद्र सपाटी पासून साधारण १७०० फुट उंच सह्याद्रीचे पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर प्रभू श्रीरामांनी वनवासात असतांना तपश्चर्येचे वेळी स्थापन केलेल्या
श्री. पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार सन १९६० च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज यांनी मंदिराचे हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम करुन केला होता, तर मंदिराच्या समोरील सभामंडप बाल ब्रह्मचारी संत गंगागिरिजी महाराज यांनी पुर्ण केला होता. सभामंडप मोडकळीस आल्याने भाविकांच्या लोकवर्गणीतून त्याचे मागील वर्षी नुतनीकरण करण्यात आले. तर मुख्य मंदिरास येथील रहिवासी व हल्ली नोकरी निमित्त छत्रपती संभाजी नगर येथे स्थायिक झालेले शिवभक्त विठ्ठल गायकवाड यांनी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च करून नवीन विशिष्ट प्रकारचा रंग दिल्याने मंदिर खुलुन दिसूं लागल्याने भाविकांसह पर्यटकांची वर्दळ वाढली असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.


Post a Comment

0 Comments