Bay- team aavaj marathi
जळगाव जिल्ह्यातील गोळेगाव बुद्रुक येथील वृद्ध दाम्पत्याला मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या मंदिरात जणू वकील रूपाने विठ्ठलच भेटल्याची हृदयस्पर्शी घटना घडली. स्वतःच्या मुलाने या वृद्ध आई-वडिलांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली व नंतर विकून टाकली होती. मात्र स्वकष्टाची शेतजमीन न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा आजी आजोबांच्या नावे परत मिळाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुलाने गोड बोलून १० फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. काही दिवसांतच त्याने वृद्ध आई वडिलांना वाऱ्यावर सोडले. २० एप्रिल २०२३ रोजी ही शेतजमीन विकून तो पत्नी समवेत सुरतला निघून गेला. आयुष्याची पूंजी गमावल्याने उदरनिर्वाह व दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. परिणामी हे वृद्ध पतीपत्नी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या मंदिरात आश्रित जीवन जगत पोट भरू लागले.
उपविभागीय अधिकारी यांचा आदेश
७/१२ उताऱ्यावर नाव लागल्याचे आजी-आजोबांच्या मुलाकडून शेत खरेदी करणाऱ्या संबंधितांनी मूळ मालकाची परवानगी न घेता शेती खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांनी खरेदीसाठी दिलेली रक्कम परत देण्यासंदर्भात कोणतेच आदेश प्रांत अधिकारी यांनी दिलेले नाहीत.
तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात मुलाच्या नावे झालेले खरेदीखत आणि पुढील सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवून रद्द केले. तसेच शेतजमीन आजींच्या नावे नोंदविण्याचे आदेश दिले. तसेच मुलाने आई- वडिलांना दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता (पोटगी) देण्याचा आदेश देण्यात आला.
आदेश समजताच वृध्द माता पित्याच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला आदेश कळताच वृद्ध आजी-आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. यासाठी ॲड.अर्जुन पाटील यांना ॲड. किशोर ए. महाजन व ॲड. धनराज प्रजापती यांनी सहकार्य केले असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की मी मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो, त्यावेळी तेथे या आजी- आजोबांची भेट झाली होती. तेव्हा त्यानी मला आपली संपूर्ण व्यथा सांगितली. त्यावर ॲड.पाटील यांनी फी न घेता न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ते पुर्ण झाल्याचे समाधान होत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
- ॲड. अर्जुन पाटील, बोदवड


0 Comments