कासलीवाल विद्यालयात बालगोपालांचा जल्लोष; दहीहंडीच्या उत्साहाने नांदगाव दुमदुमले

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 दि. ४ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालय, नांदगाव येथे बालगोपालांच्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणाने अवघे शालेय प्रांगण न्हाऊन निघाले. दहीहंडी फोडून गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राधा-कृष्णाच्या मनोहारी वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या बालगोपालांनी उपस्थितांची मने जिंकत कार्यक्रमात चैतन्याची उधळण केली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गवळणी, कृष्णजन्माची गीते, हिंदी-मराठी गीतांवरील नृत्य  नाट्यरूप सादरीकरणाने वातावरणात भक्ती, आनंद आणि उत्साह यांचा त्रिवेणी संगम साधला. चिमुकल्यांच्या निरागस अभिनयाने आणि बहारदार नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

दरम्यान, दहीहंडी फोडण्याचा क्षण येताच बालगोपालांच्या उत्साहाला उधाण आले. “हाती घोडा, पालखी... जय कन्हैया लाल की!” अशा जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. लहानग्या गोविंदांच्या उत्साहात संपूर्ण विद्यार्थीवर्ग सहभागी झाला आणि आनंदाला अक्षरशः उधाण आले.गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या अंगणात आकर्षक रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती. तसेच रंगीबेरंगी फुले आणि फुग्यांनी शालेय परिसर सजविण्यात आल्याने उत्सवाचे वातावरण अधिकच खुलून दिसत होते.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत यांनी गोपाल काल्याचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, “दहीहंडी हे केवळ आनंदोत्सवाचे प्रतीक नसून एकतेचे आणि संघ भावनेचे प्रतीक आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतभूमी तील विविध समाज घटकांना एकत्र आणण्याचे कार्य सण-उत्सव करतात. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख होतानाच त्यांच्या मनात एकात्मता, बंधुभाव आणि सहकार्याची भावना रुजते.

कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व बालगोपालांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. आनंद, उत्साह आणि संस्कृतीच्या सुंदर मिलाफाने रंगलेला हा गोपाल काला विद्यार्थ्यांच्या मनात अविस्मरणीय आठवणींची शिदोरी देऊन गेला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुनिलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष श्री. सुशील कासलीवाल, सचिव श्री. विजय चोपडा, प्रशासक श्री. प्रकाश गुप्ता, सहसचिव श्रीमती प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त श्री. रिखबचंद कासलीवाल, श्री. जुगलकिशोर अग्रवाल, श्री. महेंद्र चांदिवाल, श्री. आनंद कासलीवाल, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत व श्री. गोरख डफाळ उपस्थित होते. मान्यवरांनी बालगोपालांचे कौतुक करत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सिद्धार्थ जगताप, श्री. अभिजित थोरात, श्री. तुषार जेजुरकर, श्रीमती धन्वंतरी देवरे, श्रीमती निलोफर पठाण, श्रीमती वैशाली शिंदे, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती निशिगंधा शेंडगे, श्रीमती अर्चना बोरसे, श्रीमती पुनम खोंडे, श्रीमती मीना सुरळकर, श्रीमती शालिनी निकम आणि श्रीमती निकिता देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments