लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा म्हणजे मतदान . भारतात मतदानाच्या दिवशी लाखो नागरीक आपलं मत देतात आणि आपल्या लोक प्रतिनिधींची निवड करतात. भारतात सध्यातरी मतदानाच्या दिवशी तुम्ही तुमच्या मतदार संघात प्रत्यक्ष उपस्थित नसाल, तर तुम्ही मतदान करू शकत नाही.
जे सरकारी कर्मचारी किंवा नोंदणीकृत पत्रकार निवडणुकीच्या दिवशी दुसरीकडे ड्यूटीवर असतात, त्यांना अशी परवानगी दिली जाते.नेमकी कुणाला ही परवानगी आहे, त्याची यादी दरवेळी निवडणूक आयोगातर्फे जाहीर केली जाते.यातल्या ज्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी ड्युटीमुळे मतदान करता येणार नसेल, ते पोस्टानं मतदान करू शकतात. त्याशिवाय लष्कर, हवाई दल, नौदलात काम करणाऱ्या व्यक्तींना असं मतदान करता येऊ शकतं. जर मतदाता वर दिलेल्या निकषांमध्ये बसत असेल तर त्याला आपल्या मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज सादर करावा लागतो.
रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ती व्यक्ती, जिच्याकडे निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि निकाल जाहीर करण्याची म्हणजे रिझल्ट रिटर्न करण्याची जबाबदारी असते. साधारणपणे संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करतो.
आपापल्या विभागात कोणाकडे ही जबाबदारी दिली आहे, त्याची माहिती तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका अशा कार्यालयांत मिळू शकते.त्यानुसार टपाली मतदानासाठीचा अर्ज पात्र मतदाराला संबंधित रिटर्निंग ऑफिसरकडे मिळू शकतो.या अर्जात मतदाराची वैयक्तिक माहिती, मतदार ओळखपत्र आणि पोस्टानं मत देण्याची परवानगी का मागत आहात ते कारण द्यावं लागतं.
सर्व गोष्टींची पडताळणी झाली तर तुम्हाला पोस्टानं मत देण्याची परवानगी मिळू शकते. टपाली मतदान प्रक्रियेत साधारणतः रिटर्निंग ऑफिसर्स तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर ठराविक दिवशी मतपत्रिका आणि सोबत एक फॉर्म, सिक्रसी स्लिव्ह आणि एक लिफाफा पाठवतात. तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन ती मतपत्रिका सिक्रसी स्लिव्हमध्ये ठेवायची असते.सोबतचा फॉर्म नीट भरून दिलेल्या लिफाफ्यात ते सगळं ठेवायचं पोस्टल स्टँप वगैरे लावून निर्धारित पत्त्यावर पाठवायचं असतं.
मतदानाची टक्केवारी वाढावी आणि कुणीही मतदानापासून वंचित राहू नये , अपंग आणि वयस्कर व्यक्तींना मत देण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी स्वयंसेवक, व्हीलचेअर्स आणि वाहतुकीची सुविधा पुरवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. जे लोक मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांच्यासाठी यंदा लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं तशी सोय केली आहे. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि 40 टक्क्यांहून जास्त अपंगत्वाचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना यावेळी घरून मतदान करता येणार आहे. त्यासाठी या व्यक्तींना फॉर्म १२ ड भरावा लागेल. तो भरून इतर दस्तावेजांसोबत रिटर्निंग ऑफिसरकडे नेऊन द्यावा लागेल.त्यानंतर मतदानाच्या दिवसापूर्वी निर्धारीत वेळी मतदान केंद्राचे अधिकारी या व्यक्तींच्या घरी जातील आणि पोस्टल बॅलट भरून घेतील.यात पारदर्शकता राहावी, यासाठी ही प्रक्रिया व्हीडिओवर रेकॉर्ड केली जाईल आणि त्या मतदारसंघातल्या राजकीय पक्षांनाही आधी माहिती दिली जाईल,अर्थात या सगळ्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. पण पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात नसून आधीच्या अनुभवातून आयोगानं या प्रक्रियेत काही बदलही केले आहेत.
प्रतिक्रिया
८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांगासाठी निवडणूक आयोगाने डिसेंबर मध्ये झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत हा टपाली मतदान उपक्रम राबविला आहे, उपक्रमाचा हेतू चांगला असला तरी काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, ह्यात कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणेने दक्षता घ्यावी.
महेंद्र बोरसे, नांदगाव तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
0 Comments