नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून मार्गशीर्ष शुद्ध १४ शके १९४६, शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. येथील यात्रोत्सवास वाघोबाची यात्रा नावाने ओळखले जाते.
सविस्तर वृत्त असे की, सामान्यः वाघ म्हटले की, हिंस्र प्राणी नाव ऐकले तरी सर्वांची त्रेधा उडते परंतू नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दत्त जयंतीच्या निमित्याने वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजित करण्यात येते, व ही यात्रा वाघोबाची यात्रा म्हणून मध्य महाराष्ट्र,मराठवाडा, खानदेशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी सहा दिवस चालणाऱ्या उत्साहात लाखो रुपयांची उलाढाल होते. खवय्यांसाठी मोठमोठे हॉटेल, भांड्यांची दुकाने, महिलांसाठी विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधनांचे दुकाने, खेळणी ची दुकाने, गगनाला भिडणारी पाळणे, चप्पल चे दुकाने, कापडाची दुकाने, यासह विविध प्रकारचे व्यवसाय करणारे येथे आलेले असतात. मध्य महाराष्ट्र , खानदेश, मराठवाड्या- तील सर्वात मोठा आणि हिंस्र प्राण्याच्या नावाने कदाचित महाराष्ट्र ही एकमेव यात्रा आहे. या यात्रेस वाघोबाची यात्रा या नावाने ओळखले जाते, हा यात्रोत्सव हिंदू व मुस्लिम बांधवांचे एकात्मतेचे प्रतीक आहे.
याची एक दंतकथा सांगितली जाते, साधारण दोनशे वर्षापूर्वी युध्द, लुटमार, हिंसा,चोरी हा प्रकार नित्याचा होता, जंगली प्राण्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला होता. मानवी संस्कृती माता ढाय मोकळून रडत होती. सर्व असाहाय्य झालेले होते. अश्या परिस्थितीत त्यावेळी दंडाकारंण्यात वसलेल्या बोलठाण येथे हटयोगी,कर्मयोगी रिध्दी, सीध्दी प्राप्त योगी वैराग्याचे महामेरु संत माधवगिरी महाराज यांचे आगमन झाले,आणी येथील नागरिकांना दिलासा मिळाला ते दररोज सायंकाळी किर्तन प्रवचनाद्वारे नागरीकांच्या मनातील भिती तसेच अज्ञानपना आणी अंधश्रद्धा दुर करत असत. नागरीकांना अंनायाविरुध्द लढण्यासाठी आपले शरीर सुदृढ असावे. म्हणून त्यांनी त्याकाळी तरुणांना व्यायाम, कुस्ती शस्त्र चालविणे ईत्यादी शिकवत असे. स्वतः सीध्द पुरुष असल्याने ते विद्येच्या जोरावर अचानकच अदृश्य होत असे किंवा त्यांच्या ईच्छेनुसार कुठल्याही पशु किंवा प्राण्याचे रुप घेत असत, असेच एकेदिवशी किर्तन सुरु असतांना त्यांनी उपस्थीतांना कोणी व्याघ्ररुप धारन करण्यास इच्छुक आहे का? असा प्रश्न केला. आणी किर्तनासाठी जमलेले भाविक अचंबित झाले. तो दिवस होता मार्गशीर्ष पोर्णिमा दत्त जयंतीचा सर्वजन एकमेकांकडे पहावयास लागले. कोणीच होकार देत नाही.
असे पाहून महाराजांनी जमिनीवरील पाच खडे उचलुन मंत्रोच्चार करुन ते खडे उपस्थित असलेल्या भाविकांना दिले आणी त्यांना सांगितले की मी घेतो वाघाचे रुप व मी वाघाचे रुप घेतल्यानंतर तुम्ही त्याचे दर्शन घ्यावे जेणेकरून तुमच्या मनात असलेली भिती नाहीशी होईल. व तुम्ही अन्यायाविरुध्द लढण्यासाठी परीपक्व व्हाल, परंतु लक्षात असु द्या मी मंत्रोच्चार करुन दिलेले हे पाच खडे माझ्याकडे (वाघाच्या दिशेने भिरकवा) त्यातील एक ही खडा मला लागला तरच मी पुन्हा मनुष्य रुपात प्रकट होईल. अन्यथा मी पुन्हा मनुष्य रुपात येऊ शकणार नाही. असे सांगितले व त्यांनी वाघाचे रुप धारण केले. ते पाहून उपस्थित नागरिक भयभीत झाले सैरावैरा पळु लागले. त्या गडबडीत महाराजांनी मंत्रोच्चार करुन भक्तांच्या हातात दिलेले खडे पडले गेले. महाराज वाघाच्या रुपात एकाच जागी ऊभे होते. परंतु धावपळीत हातातून पडलेले खडे सापडत नाही हे पाहून वाघाचे रुप धारण केलेले माधवगिरी महाराज त्यावेळी असलेल्या घनदाट जंगलात निघून गेले.
तेव्हा पासून येथे दत्त जयंतीनिमित्त वाघोबाची यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. येथे नागरिकांनी श्रमदाणातुन आणी लोकवर्गणीतून वाघोबा चे मंदिराचे बांधकाम केले असुन मंदिरात वाघाची मुर्ती आहे. येथील आणी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रध्देने मंदिरात जाऊन वाघोबाचे दर्शन घेतात. या मंदिराची देखभाल ट्रस्ट करत असून मंदिर परिसरात असलेले मालकिच्या जागेत व्यापारी संकुलाचे बांधकाम केलेले आहे. त्यातुन मिळाल्या उत्पन्नातुन मंदिराची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. या यात्रेची सुरुवात बुधवार दि.११ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त वाघोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.
यानिमित्ताने बोलठाणचे ग्रामदैवत वाघोबा महाराज व श्री दत्त महाराज यांची भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. १७ मंगळवार रोजी ११ वाजे पासून जंगीकुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या मध्ये शेजारील छत्रपती संभाजी नगर, जळगाव, व नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नामवंत मल्ल सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात बक्षिसे मिळवितात. यात्रा शांतता पुर्ण व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी वाघोबा मंदिर ट्रस्ट, दत्त पुर्णांर्ती भजनी मंडळ, व सर्व बोलठाण ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष माजी ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, उपाध्यक्ष गोरख (बंडु) पवार, खजिनदार प्रल्हाद रिंढे, मनोज रिंढे, विश्नु बारवकर,तन्मय बाविस्कर, भगवान बारवकर, अन्सार मन्यार मुस्ताक शहा, पोपट कोल्हे, दिगंबर नवले, रविंद्र रिंढे दिनेश रिंढे, रफिक पठाण विजय सोनी व सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि येथील हिंदू आणि मुस्लिम बांधव प्रयत्नशील असतात.
0 Comments