या तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले सव्वा ८ हजार शेतकरी राहणार नुकसान भरपाई पासून वंचित

 Team- aavaj marathi 

स्पेशल रिपोर्ट पत्रकार एकनाथ भालेराव 
येवला (नाशिक)

येवला तालुक्यात खरीप हंगाम 2024 मध्ये दिनांक 19 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर मध्ये येवला तालुक्यातील सर्वच गावात अतिवृष्टी ने झालेले नुकसानी चे 8203 दावे शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरले होते. ओरिएंटल विमा कंपनी, कृषी अधिकारी, आणि शेतकरी यांच्या संयुक्त समितीने नुकसान पाहणी करून निश्चित करणे गरजेचे होते. परंतु निवडणुकीचे कारण सांगत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी संयुक्त पाहणीला उपस्थित राहिले नाही. तसेच सादर केलेल्या विमा दाव्याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कृषी विभागाने अद्याप सहमती दर्शविली नाही. त्यामुळे येवला तालुक्यातील 8 हजार शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे चित्र तयार झाले आहे. 

एकंदरीत विमा कंपनी आणि कृषी खाते यांच्या कडून टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे. कृषी खात्याने विमा कंपनी संयुक्त पाहणी ची रीतसर नोटीस दिल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात अतिवृष्टी झाली, उभ्या पिकाचे नुकसान झाले हे माहिती असून सुद्धा कृषी खाते यांनी विमा कंपनीशी स्वतःहून समन्वय ठेवला नाही व संयुक्त पाहणी केली नाही.विमा कंपनीने केलेल्या नुकसान भरपाईच्या तपासणीस सहमती दर्शविण्यास टाळा टाळ केली जात आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेची प्रीमियम रक्कम मात्र विमा कंपनीला आधीच भरली गेली आहे. यातून विमा कंपनीला शासनाकडून प्रीमियम रूपात कोट्यावधी रुपयाचा महसूल जमा झाला आहे. विमा प्रतिनिधींनी रीतसर नुकसानी चे अहवाल सादर केले आहेत, त्यास फक्त सहमती दर्शविणे एवढेच बाकी असताना कृषी खात्याकडून अडवणूक का होत आहे? असा प्रश्न नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यात मका चे 3712 दावे,सोयाबीन चे 1985 दावे, कांद्याचे- 1416 दावे आणि कापूस, मूग, बाजरी, भुईमूग, तूर, ज्वारी -1090 असे 8203 नुकसान भरपाई बाबत दावे दाखल करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या आडगाव रेपाळ- 532, गवंडगाव - 373, अनकुटे - 323, विसापूर - 286,अंदरसूल - 259,सावरगाव - 252 आणि अंकाई येथील - 250 असे 2275 नुकसानीचे दावे दाखल करण्यात आले आहे.100 पेक्षा जास्त दावे असलेली 22 गावे असून त्यात एकूण दावे 3061 आहेत. 89 गावात 100 पेक्षा कमी दावे असले तरी प्रत्यक्ष नुकसानी चे प्रमाण जास्त आहे. त्यातील 2867 दाव्यांच्या बाबतीत खुद्द कृषी खाते उदासीन दिसत आहे.

एकीकडे नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला कृषी मंत्री पद आल्याचा आनंद साजरा करायचा की कृषि खात्याच्या आडमुठे पणामुळे 8000 शेतकरी 40 कोटीच्या नुकसान भरपाई पासून वंचीत राहतील याचा दुखवटा साजरा करायचा हा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. 25 जानेवारी पर्यंत कृषी खात्याने दाव्यांना सहमती न दर्शविल्यास प्रजासत्ताक दिनी कृषी मंत्र्यांचा निषेध करत सरकारी अधिकाऱ्यांना ध्वजवंदन करून दिले जाणार नाही. असे येवला येथील शेतकरी कर्जमुक्ती अभियान चे संयोजक श्री.भागवत राव सोनवणे यांनी आवाज मराठी न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी एकनाथ भालेराव यांच्याशी बोलताना सांगितले.


Post a Comment

0 Comments