शिस्त आणि कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या ‘खाकी’ वर्दीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच शनिवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि पोलीस दलाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. ड्युटी लावण्यासारख्या अंतर्गत प्रशासकीय कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे पर्यावसान थेट रक्ताच्या थारोळ्यात आणि गंभीर दुखापतींमध्ये झाले. या घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी आणि राकेश पाटील यांच्यात शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शाब्दिक चकमकी ने सुरू झालेल्या या वादाने काही क्षणांतच हिंसक वळण घेतले. रागाच्या भरात दोन्ही कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर पोलीस ठाण्याच्या आवारातच हल्ला चढवला.
या झटापटीत पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दुसरे पोलिस कर्मचारी राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा हात फॅक्चर (अस्थिभंग) झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच काही अंतर्गत वाद आणि मतभेद होते. शनिवारी रात्र पाळीच्या ड्युटीच्या लावण्या वरुन त्यांच्यात पुन्हा ठिणगी पडली आणि जुन्या रागातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे सांगितले जाते. दोन्ही जखमी पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, या प्रकरणी खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
0 Comments