नाशिकमध्ये भाजप खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग,क्षणात झाला कोळसा

 Bay- team aavaj marathi 

 मुंबई-नाशिक महामार्गावर खासदाराच्या धावत्या रेंज रोव्हर कारला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने कारचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे खासदारासह कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले असून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या आगीत कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर कार ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यावेळी स्थानिक अग्निशामक दलाला दुर्घटनेची माहिती देत पाचारण करण्यात आले होते. त्यानी कारला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

नाशिकमध्ये आगीत भाजप खासदाराची जळून खाक झालेली  रेंज रोव्हर कार

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील भाजप खासदार लुंबाराम चौधरी हे वाशिम येथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले होते. ते रेंज रोव्हर कार (क्रमांक एम एच ०१. डी के ९९७५) मधून हे प्रवास करत होते. सदर कार शहापूर येथील चालक अनिल बबन जाधव (वय ४०) हे चालवत होते. कार गोंदे फाटा परिसरातून जात असताना चालकाला अचानक काहीतरी जळाल्याचा उग्र येऊ लागला. काहीतरी अघटीत घडत असल्याचे लक्षात येतात चालक अनिल जाधव यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. कारला आग लागली असल्याचे दिसतात त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता खासदार चौधरी आणि तर सहकाऱ्यांना गाडीतून खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. काही मिनिटातच आगीने रौद्ररुप धारण केले आणि कारचा अक्षरशः कोळसा झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच वाढीवरे पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक अग्निशामक दलाला याबाबत पाचारण देखील करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण देखील मिळवले. परंतु गाडीचा केवळ सांगाडा उरला होता. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत देखील झाली होती. 

Post a Comment

0 Comments