Bay -team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
इसापूर धरणाची पाणीपातळी ७५.२७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवार, २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता धरणाची पातळी ४३८.६१० मीटर झाली असून, धरणात ७२५.६८८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तविली जात असून, पैनगंगा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. इसापूर धरणाची एकूण साठवण क्षमता ९६३.०९ दशलक्ष घनमीटर असून, सध्या उपयुक्त साठा ९१.४३ टक्के झाला आहे.
म्हणजेच ४४०.१२ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयातर्फे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, धरणातून पाणी सोडल्यास त्याचा परिणाम यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव आणि उमरखेड नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट आणि हिंगोली जिल्ह्यांतील कळमनुरी या तालुक्यातील नदी काठावर असलेल्या अनेक गावांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना पूर्वतयारीचा आदेश देण्यात आला आहे. धरण परिसरात पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास आणि जल पातळी आणखी वाढल्यास, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणातून नियोजित स्वरूपात विसर्ग करण्यात येणार असल्याचेही यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे नदीपात्रात अनावश्यक हालचाल टाळाव्यात आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाशी संपर्कात राहावे. शेतीसाठी व दैनंदिन उपयोजनेसाठी पाण्याचा योग्य वापर करावा. आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास तत्काळ मदतीसाठी स्थानिक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0 Comments