नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. तसेच पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १६ जानेवारी रोजी 'साहित्यावर बोलू काही...' या विषयावर मा. सुरेश नारायणे यांच्या व्याख्यानाने पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. ज्यात त्यांनी मराठी साहित्यातून मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी मार्गदर्शन केले. याचसोबत मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषेचे जतन व्हावे या हेतूने प्रश्नमंजुषा स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप कवी संमेलनाने झाला. सदर कवी संमेलनासाठी मा. काशिनाथ गवळी, मा. सुरेश नारायणे मा. विद्या माळी आणि मा. प्रतिभा खैरनार ह्या निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होत्या. या कवी संमेलनातून निमंत्रित कवींनी सामाजिक, प्रेम आणि मराठी भाषेची अस्मिता या विषयावर आशयगर्भ कविता सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मराठी विभागप्रमुख प्रा. योगेश वाघ यांनी प्रास्ताविकातून वाचनाने माणूस समृद्ध होतो आणि भाषा समृद्ध होत जाते असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी मराठी भाषेचे सौंदर्य आपल्या संवादातून उलगडून दाखवले.सदर प्रसंगी मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. चिंतामण निगळे, डॉ. सुरजकुमार प्रसाद, डॉ. पंकज निकम, प्रा. संदीप दोंड, डॉ. भारती धोंगडे, प्रा. सोनाली आवारे, प्रा. अनिल जाधव, डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. भीमराज गायकवाड, डॉ. बाबाजी आहिरे आणि कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. योगेश वाघ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार मराठी विभागाच्या प्रा. छाया आहिरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा.प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
0 Comments