उमरखेड तालुक्यातील साखरा येथील प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत गणपती मंदिरातून भरदिवसा अज्ञात चोरट्याने गणपती मूर्तीवरील ६० हजार रुपये किंमत असलेला चांदीचा मुकुट लंपास केला ही घटना २५ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, गणेश भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत विकास विश्वनाथ पामलवाड यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली असून, फिर्यादी हे मंदिराची देखरेख करतात. दि.२५ जानेवारी रोजी दुपारी हॉटेलच्या कामासाठी ते बाहेर गेले होते. दुपारी १ ते ५ या वेळेत भाविक दर्शनासाठी मंदिरात येत-जात होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने गणपतीच्या मूर्तीवरील ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला.
जेव्हा सायंकाळच्या सुमारास ही बाब पामलवाड यांच्या निदर्शनास आली. तेव्हा लगेचच त्यांनी उमरखेड पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.उमरखेड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत असून त्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.
0 Comments