नांदगाव येथील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालय येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत भारतीय टपाल खात्याला भेट देत पत्रांच्या अद्भुत प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही टपाल सेवेचे सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
नांदगाव पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर श्री. धनराज सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करत टपाल तिकिटांचा दुर्मीळ व आकर्षक संग्रह विद्यार्थ्यांना दाखविला. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, पाकीट, लिफाफा यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो, पत्र पाठविण्यापासून ते ते योग्य पत्त्यावर पोहोचेपर्यंत चा संपूर्ण प्रवास त्यांनी सोप्या व रंजक शब्दांत समजावून सांगितला. बदलत्या काळानुसार टपाल खात्यात झालेले डिजिटलायझेशन, पोस्ट मार्फत बँक खात्यांची सुविधा, आर्थिक व्यवहार याविषयीची माहिती विद्यार्थ्यांसाठी नव्याने ज्ञानाची दारे उघडणारी ठरली.
या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन माननीय श्री. सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता सर, सहसचिव प्रमिला कासलीवाल, तसेच विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल यांनी विशेष कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत व सर्व शिक्षक वृंदावन नी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वात भर पडते, असे मत व्यक्त केले.
या शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, तुषार जेजुरकर, श्रीमती धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, वैशाली शिंदे, जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत, अर्चना बोरसे, पूनम खोंडे, मीना सुरळकर, शालिनी निकम, निकिता देशमुख यांनी परिश्रमाचे सोने केले. ज्ञान, अनुभव आणि आनंद यांची त्रिवेणी साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला असून “शाळा म्हणजे केवळ वर्ग खोली नव्हे, तर जीवनाचे विद्यापीठ आहे” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
0 Comments