नांदगाव येथील शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री.एम.जे. कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट संचलित सौ.क.मा. कासलीवाल प्राथमिक विद्यालयात दिनांक २ व ३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. खेळाडूंच्या टाळ्यांच्या गजरात, घोषणांच्या निनादात आणि विजयाच्या आनंदात विद्यालयाचा परिसर भारावून गेला.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे सचिव माननीय श्री. विजय चोपडा व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.“खेळ ही केवळ स्पर्धा नसून जीवन घडविण्याची प्रयोगशाळा आहे,” हे सूत्र विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळातून प्रत्यक्षात उतरविले.
क्रीडा महोत्सवात कबड्डी, डॉजबॉल यांसारखे सांघिक खेळ तसेच सॅकरेस, बेडूक उड्या, १०० मीटर धावणे, लिंबू–चमचा शर्यत, संगीत खुर्ची अशा विविध वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेत चुरशीचे सामने, खेळाडूंची धडपड, विजयासाठी ची जिद्द आणि पराभव ही हसत स्वीकारण्याची वृत्ती पाहायला मिळाली.
सामन्यांचे पंच म्हणून श्री. तुषार जेजुरकर व श्री. सिद्धार्थ जगताप यांनी जबाबदारीने काम पाहिले. गुण लेखनाची धुरा श्री. अभिजीत थोरात व श्रीमती जयश्री अनवडे यांनी सांभाळली. स्पर्धांचे रसपूर्ण व धावते समालोचन श्रीमती निलोफर पठाण व श्रीमती धन्वंतरी देवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुबक व प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती वैशाली शिंदे यांनी केले, तर सुसंवादी आभार प्रदर्शन श्रीमती जयश्री पाटील यांनी मानले.
क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी-खेळाडूंना प्रमाणपत्रे,मेडल्स व ट्रॉफी देऊन गौरविण्यातआले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत म्हणाले, “शिक्षणाबरोबरच खेळाकडेही गांभीर्याने पाहणे काळाची गरज आहे. खेळातून केवळ आरोग्यच नव्हे, तर यश, आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराच्या संधीही मिळू शकतात. म्हणून खेळाकडे करिअरच्या दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय श्री. सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष श्री. सुशील कासलीवाल, सचिव श्री. विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता सर, सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदीवाल, आनंद कासलीवाल, तसेच मुख्याध्यापक व्ही. पी. सावंत यांनी विजेत्या संघांचे, सर्व खेळाडूंचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी श्री. सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, तुषार जेजुरकर, श्रीमती धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, वैशाली शिंदे, जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत, अर्चना बोरसे, पुनम खोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
खेळ हा केवळ विजय– पराजयाचा खेळ नसून तो जीवनाला दिशा देणारा संस्कार आहे. क्रीडांगणावर घाम गाळणारी ही पिढीच उद्याच्या समाजाला सक्षम, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासाचे नेतृत्व देईल. “खेळा निरोगी राहा, जिंका आत्मविश्वास, आणि आयुष्यभर जपा खेळाडू वृत्ती,” हा संदेश देत कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला
0 Comments