Bay--team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जातेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य दैवत श्री पिनाकेश्वर महादेवाचे महाशिवरात्री च्या निमित्ताने शुक्रवारी दि.८ रोजी भल्या पहाटे पासून सायंकाळी उशिरापर्यंत अबालवृद्ध आणि महिलांसह सुमारे पंचवीस हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथील तरुण पिनाकेश्वर भक्त मंडळाच्या सहकार्याने मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर क्रमांक दोनचे असलेले नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस छत्रपती संभाजी नगर जळगाव आणि नाशिक या तीन जिल्ह्याच्या वनविभागाच्या सरहद्दी वरील सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर प्रभू श्रीराम यांनी वनवासात असताना स्थापन केलेल्या हे मंदिर आहे.
ह्या मंदिराचा जीर्णोद्धार संत जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज यांनी १९६० च्या दशकात जयपूर येथून देवी देवतांच्या मूर्ती आणून श्री क्षेत्र वाराणसी ब्रम्हवृंदांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करून केला होता, त्यानंतर मंदिरासमोरील सभामंडप, आणि इतर कामे संत गंगागिरिजी महाराज यांनी केला होता.
सालाबाद प्रमाणे यंदाही रात्री बारा वाजता देवस्थानच्या वतीने महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले रात्री अनेक भाविक दर्शनासाठी मुक्कामी आलेले होते.
तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वैजापूर व कन्नड तालुक्यातून ठिकठिकाणाहून अनवाणी पायाने शेकडो भाविक दिंडी घेऊन आले होते. सर्वांना देवस्थानच्या वतीने मोफत खजूर वितरण करण्यात आले. रात्री बारा वाजेपासून ते शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत २५ हजार पेक्षा अधिक भाविकांनी देवाचे दर्शन घेतले असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
दुपारी बारा वाजता शासनाच्या वतीने नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या हस्ते देवाला महाभिषेक केला यावेळी पोलीस बांधव आणि विश्वस्त मंडळ उपस्थित होते. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज वाघमारे पो.हवा. भास्कर बस्ते यांच्यासह पोलिस बांधव आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल, होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
*आ. सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने भाविकांना रुद्राक्ष वितरण*
येथे देवाच्या दर्शनासाठी आलेल्या ५१०० भाविकांना आ. सुहास अण्णा कांदे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजुमताई कांदे यांच्या वतीने बाजार समितीचे सभापती अर्जुन (बंडू) पाटील, युवा सेना माजी तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, शिवसेना नेते संतोष गायकवाड, किशोर आहेर, भरत पाटील, सौरभ पाटील आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते रुद्राक्ष वितरण करण्यात आले .
0 Comments