तालुक्याचे आ. सुहास कांदे यांनी नांदगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधत असताना बेरजेचे राजकारण ही तितक्याच ताकदीने सुरु ठेवले आहे,याची प्रचिती माजी आमदार संजय पवार यांच्या अधिकृत शिवसेना प्रवेशाने आली आहे. यापुर्वी देखील इतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनाआ.सुहास अण्णा यांनी सन्मान पुर्वक आपल्या सोबत घेतले आहे.
मनमाडचा गेल्या कित्येक वर्षाचा पाणीप्रश्न सुटल्यात जमा आहे, औद्योगिक वसाहतीचे काम शासकीय पातळीवर वेगात सुरु आहे. नांदगाव शहर व ग्रामीण भागातील जनतेसाठी पाणी पुरवठा योजनांनी गती पकडली आहे. गावांतर्गत पक्के रस्ते, बहुुद्देशिय सभागृह, मंदिरांसाठी सभामंडप तर अगणित निर्माण केले आहेत. रस्ते, पाणी, सार्वजनिक सुविधा यासह मूलभूत गरजा आणि नुकसानग्रस्तांना वैयक्तिक आर्थिक, अन्नधान्य मदत यामुळे ते तालुक्यात या अगोदरच्या लोकप्रतिनिधी पेक्षा वेगळे ठरले आहेत.
हे सर्व होत असताना आगामी राजकारण सोयीस्कर व्हावे म्हणून आ.कांदे यांनी एक -एक मोहरा गळास लावण्याचे काम ही अव्याहतपणे सुरु ठेवल्याचे दिसून येत आहे. काल माजी आमदार पवारांच्या अधिकृत शिवसेना प्रवेशाने प्रयोग यशस्वी ठरल्याने त्यांचा हुरूप अजून वाढल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आ.पवारांनी भुजबळांची साथ सोडल्याने पुढे काय? हा प्रश्न त्यांच्या शिवसेना प्रवेशाने निकाली निघाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती बघता या पक्षप्रवेशाने आमदार कांदेंच्या राजकीय ताकदीला अजून बळ प्राप्त झाले आहे.
भालूर गटात व तालुक्याच्या बहुतांश गावात अजूनही माजी आ. पवारांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे ती ताकद आता आ.कांदे यांच्या पदरात पडणार असल्याने शिवसैनिकांचा हुरूप वाढला आहे. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.पवार यांनी भगवा पुन्हा एकदा खांद्यावर घेतला. यावेळी मंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी,तालुकाप्रमुख शाईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, माजी सभापती किशोर लहाने, उपस्थित होते.
राजकीय पक्ष वेगळा मात्र काम सोबतच करावे लागणार.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांच्या भुमिके वरुण माजी.आ पवार यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाहेर पडले असले तरी, शिवसेना शिंदे गट,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या राजकीय पक्षाच्या युतीमुळे छगन भुजबळ यांच्या सोबतच काम करावे लागणार असल्याने सासु च्या...... वाटणी केली. पण न कळत पुन्हा सासुबाई शेजारी (रुम) खोली मिळाली असल्याचे गावातील पारावरच्या चर्चेत बोलले जात आहे.
0 Comments