प्रहार संघटनेचे नांदगाव औरंगाबाद रस्त्यावर अर्ध नग्न आंदोलन, दुतर्फा वाहतूक ठप्प

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव ते औरंगाबाद राज्य मार्गावर जळगाव फाटा दरम्यान २६ वर शुक्रवार दि. २ रोजी सकाळी अकरा वाजता प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्धनग्न अवस्थेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप निकम यांच्याकडून लेखी आश्वासन स्विकारताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य मार्ग २६ ची मागील काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करुन डागडुजी करण्यात आली होती. तर काही ठिकाणी सिंगल डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु कन्नड येथून चाळीसगाव कडे जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या औट्राम घाट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेशानुसार सुमारे सहा महिन्यांपासून जड वाहतूकीसाठी बंद करून सदरची वाहतूक शिऊर बंगला तलवाडा, कासारी मार्गे चाळीसगावच्या दिशेने वळवीण्यात आली आहे. 

रास्तारोको आंदोलना दरम्यान ठप्प झालेली वाहतूक 

या रस्त्यावर अतिरिक्त जड वाहनांची वर्दळ वाढल्याने नांदगाव तालुक्यातील कासारी ते जळगाव फाटा दरम्यान आठ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्याची ताबडतोब खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत झोडगे,जय भागवत, रविद्र सूर्यवंशी, रविकांत भागवत,निवृत्ती सोनावणे, गणेश चव्हाण,नानाभाऊ मोरे, बुरकुल,राजू चव्हाण यांनी जळगाव फाटा दरम्यान अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको करून आंदोलन केले. सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते. या दरम्यान दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप निकम यांनी येत्या आठ दहा दिवसांत खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले, व त्वरित मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले त्यानंतर प्रहार संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शना- -खाली पोलिस हवालदार डि.बि. सोनवणे, एस.एस. मेहर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.




Post a Comment

0 Comments