मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव/भरत पाटील पत्रकार जातेगाव
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज दि. २९ रोजी नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सौ.अंजुमताई कांदे यांच्यासह शिवसेना, भाजप, व रिपाई चे वरिष्ठ नेते, पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्त्यांसह सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आ. कांदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्याअगोदर देवाज बंगला येथे सौ.अंजुमताई कांदे यांनी त्यांचे औक्षण केले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात शिवसृष्टी येथील आलेल्या आशिया खंडातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शक्ती प्रदर्शन करत रॅलीस सुरुवात करण्यात आली ही रॅली जैन धर्म शाळेपासून नगरपरिषद जात असताना संत सावता महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या होळकर शाही घराण्याचे राजमुद्रेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा जोतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचे जुन्या तहसील कार्यालया- जवळ सभेत रूपांतर झाले.
याप्रसंगी महायुतीचे उमेदवार सुहास कांदे म्हणाले की, मनमाड करंजवन पाणी योजना, नांदगाव गिरणा धरण पाणी योजना, ७८ खेडी पाणी योजना,आशिया खंडातील एकमाद्वितीय शिवसृष्टी, महर्षी वाल्मिकी स्टेडियम,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, यांचे स्मारक, अगणित सभामंडप, इदगाह, अनेक गावात शादीखाना,अनेक गावांत जलजीवन योजना फक्त अडीच वर्षात सुमारे साडे तीन हजार कोटीची विकासकामे शासकीय निधीतून खेचून आणली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैयक्तिक स्वखर्चाने एक लाख चष्मे वाटप, ३० हजार डोळ्यांची शस्त्रक्रिया, अनेक आपदग्रस्त कुटुंबांना आर्थिक, अन्नधान्य, कपडे आदी मदत, ही कामे केली असल्याचे उमेदवार सुहास कांदे यावेळी म्हणाले.
याउलट भुजबळ कुटूंबाला दहा वर्षे सत्ता मिळुनही दोन इमारती बांधण्या पलीकडे त्यांचा विकास गेला नाही.आज अपक्ष उमेदवारी करून जनतेला भुलथापा देत आहेत. तरी पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या, पुढची कारकीर्द तालुक्यातील शेतीच्या जल सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी घालवेन असा शब्द देतो असे ही कांदे म्हणाले. यावेळी विरोधकांनी काही उमेदवार मुद्दाम उभे केले आहेत. मात्र जनता हुशार आहे. ती जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही. असा माझा ठाम विश्वास आहे, असे ही आहे. या तालुक्याची सेवा करत असताना मी कुटूंबाकडे ही लक्ष दिले नाही. माझा एक एक क्षण या मतदार संघांच्या विकासासाठी अजून काय काय करता येईल यासाठीच घालवला.असे म्हणाले हे सांगताना सुहास कांदे अत्यंत भावुक झाले होते. व त्यांच्या डोळ्यातून अश्रू ही तरळले.
तत्पूर्वी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आ. सुहास कांदे यांचे नेतृत्वच मतदार संघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाईल. असे सांगत महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून व्यक्त केले. याप्रसंगी मतदार संघातील बहुतेक महत्वाचे नेते, पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, सरपंच, सदस्य,सोसायटी चेअरमन,सदस्य,व महिला, तरुणी, तरुण, पुरुष, जेष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. .
0 Comments