नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर आयोजित 'विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा' समारोप सोहळा संपन्न झाला. या समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.नरहरी गोराडे होते. विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील, संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री.अशोकराव मोरे, व श्री रवींद्र कवडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना प्रा.जी.व्ही. बोरसे यांनी ह्या श्रमसंस्कार शिबिरात झालेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी प्रतिक्षा गीते,गोरख खरक, हितेश साबळे,प्रतिभा शिंदे, जयश्री गीते, ह्या विद्यार्थ्यांनी शिबीरातील अनुभव आपल्या मनोगतातून कथन केले. प्रतीक्षा गीते व नंदिनी यादव या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू या शिबीराच्या माध्यमातून शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांची मेहनत, कष्ट व त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गौरवोद्गार काढले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाल्यामुळे लोकशाही शासन प्रणालीला अभिप्रेत आदर्श व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असल्याने विद्यार्थ्यांनी नेहमी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नरहरी गोराडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व या शिबीरात झालेल्या उपक्रमांचे कौतुक केले. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आजच्या धकाधकीच्या काळात आपले आरोग्य निकोप ठेवण्यासाठी योग, प्राणायाम व व्यायाम करावा असे आवाहन केले. ह्या सात दिवसीय शिबीरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रतीक्षा गीते व दिगंबर खैरनार या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड, प्रा.जी.व्ही.बोरसे,एन. एस. एस . सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.एस. सी.पैठणकर, प्रा. श्रीमती एस.ए.लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. बी.के. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डी.एम राठोड यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिबीरार्थी विद्यार्थी उपस्थित होते. समारोप समारंभ निमित्त आयोजित स्नेह भोजनाचा शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.
0 Comments