वास्तुशांती करून गृहप्रवेश करण्याची आपली कित्येक वर्षांची परंपरा आहे.वास्तुशांती म्हणजे होमहवन,कर्मकांड आले. त्यासाठी हजारो रुपयांचा चुराडा करून आता आपल्या वास्तूत सुख शांती लाभेल या भोळ्या भाबड्या आशेने अजूनही या पारंपरिक यज्ञयाग, धार्मिक विधी केल्या जातात. वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा आपण संत, समाजसुधारक यांचा वारसा न जुमानता कर्मकांडात अडकल्याचे चित्र विचार करायला लावणारे आहे. आपण महात्मा फुले, शाहू,आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे असे अभिमानाने सांगतो,त्यांचे विचार आचरणात आणण्याचे फक्त अभिवचन आपण महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी पुरतेच देतो, प्रत्यक्षात त्या विरुद्ध आचरण करून पुन्हा कर्म कांडात अडकतो हे चित्र बदलण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्हा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी समाजासमोर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन संत, समाजसुधारक,महापुरुष यांचा वारसा पुढे नेऊन आपल्या "गिरजालय" या वास्तूचा गृहप्रवेश तसेच वास्तूपूर्तीचा आनंद सोहळा आगळ्या पद्धतीने साजरा केला.या निमित्ताने डॉ.झळके यांनी महात्मा बसवेश्वर, छ्त्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी नाशिक जिल्हा महा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पदाधिकारी राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिश्री, प्रा.आशाताई लांडगे,कोमल वर्दे ,विजय खंडेराव तसेच सिन्नर शाखेचे महा.अंनिसचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे,कार्याध्यक्ष सुकदेव वाघ,प्रधान सचिव राजेंद्र मिठे, उपाध्यक्ष राहुल पगारे,दीपक भालेराव,बापू चतुर, महामित्र दत्ता वायचळे, दीपक भालेराव,प्रमोद काकडे, बस्तीराम कुंदे तसेच डॉ.संजय चव्हाणके, रुद्राक्ष झळके, अनिल पठाडे ,योगेश लिंगायत,महेश डबे डॉ. श्यामसुंदर झळके,सौ.शोभा झळके आदी उपस्थित होते.यावेळी प्रा.आशा लांडगे यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून शपथ दिली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी सिन्नर मधील राजकीय,सामाजिक,शिक्षण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी वास्तू निर्मितीत योगदान देणारे, श्रमजीवी कामगार, अभियंता, इलेक्ट्रिशियन, सफाई कामगार, प्लंबर,पेंटर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या क्रांतिकारी उपक्रमाची सुरुवात करून समाजाला संदेश दिल्याबद्दल व आदर्श पायंडा पाडल्याबद्दल झळके परिवाराला धन्यवाद दिले.
0 Comments