अज्ञात मोटारसायकल स्वाराने वृद्धाच्या हातातून दागिने व रोख रक्कमेची पिशवी घेऊन केला पोबारा

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील तालुका पोस्ट कार्यालय ते पोलीस स्टेशन समोरील हुतात्मा चौकाकडे पायी चालत जाणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यातील पुरुष व्यक्तीच्या हातातून अज्ञात दुचाकी चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पिशवी पळविल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वाखारी येथील रहिवासी श्री गोरख त्र्यंबक चव्हाण हे पत्नीसोबत दिनांक १८ मार्च रोजी नांदगाव येथे एका बँकेतून आणि पोस्टात जमा केलेली रक्कम काढून ते सर्व एकत्र करून येथील सोनार कडून दागदागिने खरेदी करून शहरातील पोस्ट ऑफिस ते हुतात्मा चौक दरम्यान पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात पल्सर दुचाकी स्वरांनी त्यांच्या हातातील पिशवीवर झडप घालून पळून नेली. वरील चोरीची घटना घडताच गोरख चव्हाण व त्यांच्या पत्नीने जवळचं असलेल्या तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ पोलीस गाडीने चव्हाण यांना सोबत घेऊन मनमाड पर्यंत अज्ञात चोरट्यांचा नाकाबंदी करून पाठलाग केला, परंतु भामट्यांचा शोध लागला नाही.

वरील घटनेबाबत नांदगाव पोलीस स्थानकात गोरख चव्हाण  यांनी दिलेल्या फिर्यादीत तीन लाख रुपये नुकसान झाले परंतु पोलीस नोंदीमध्ये दोन लाख १८ हजार रुपये ऐवज दाखवण्यात आलेला आहे. चव्हाण यांच्या मुलाचे दिनांक २६ मार्च रोजी असलेल्या लग्न समारंभाच्या निमित्ताने येथील सोनाराच्या दुकानातून सोन्या चांदीचे दागिने आणि बॅंकेतुन काढलेली उर्वरित रोख रक्कम हातातील पिशवीत घेवून पायी चालत जात असताना त्यांच्या हातातून ही रोख रक्कम एका पल्सर मोटारसायकल वरून पाठीमागून आलेल्या हिसकावून घेवून चोरट्यांनी पळविले.त्या पिशवीमध्ये आधार कार्ड सोने खरेदीचे पावत्या बँकेचे पासबुक पोस्टाचे पासबुक गॅस भरण्यासाठी लागणारी पुस्तक कामगार विभागाचे पुस्तक पोस्टाचे एफ.डी चे बुक पॅन कार्ड इत्यादी महत्त्वाची कागदपत्र त्या पिशवीमध्ये होते. अचानक झालेल्या आर्थिक हानी मुळे कुटुंबावर ऐन विवाहाच्या प्रसंगी आर्थिक संकट कोसळले आहे.

पोलिसांच्या वतीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन 

वरील घटनेची पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी त्याच प्रमाणे बॅंकेतुन पैसे घेऊन बाहेर पडताना मौल्यवान वस्तू खरेदी करताना किंवा खरेदी केल्यानंतर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी घरातील व्यक्तींनी शक्यतो शहरामध्ये वयोवृद्ध माणसांच्या सोबत रहावें. असे आवाहन पोलिस निरीक्षक चौधरी यांनी केले आहे.




 
 

Post a Comment

0 Comments