वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयात ३३ वर्षांनी पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

रविवार दिनांक २९ रोजी किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे ३३ वर्षांनी १६ विद्यार्थी आणि ९ विद्यार्थिनी एकत्र आले. कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर रांगेत आपल्या वर्गात जाऊन बसले. शिक्षक मांडवडे सरांनी त्यांची हजेरी घेतली. श्रीमती हिरे मॅडम यांचे या बॅच सोबत विशेष ऋणानुबंध होते. पुन्हा शालेय जीवन अनुभवण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. सर्वांनी शिक्षकांना आपला परिचय करून दिला. जीवनात झालेली प्रगती सांगितली. आपले नाव, सध्या असलेला व्यवसाय, अपत्यांचे शिक्षण, सध्याचा पत्ता वगैरे माहिती दिली.

 सर्वांनी आपल्याला सोडून गेलेले शिक्षक आणि वर्गमित्र यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी यावेळी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

जेंव्हा या वास्तूची पायाभरणी झाली आणि शाळेचा नवीन वास्तूत प्रवेश झाला तेंव्हाची बॅच असल्याने त्यांनी केलेले श्रमदान, झाडांसाठी विहिरीवरून आणलेले पाणी, शिक्षकांनी घेतलेली मेहनत यावर माजी शिक्षक श्रीमती हिरे मॅडम, अनिल पवार सर, मांडवडे सर, पोपट चव्हाण सर भरभरून मनोगत व्यक्त केले. तत्कालीन ग्रामस्थांचे शाळा उभारणीत लाभलेले सहकार्य, शाळा विना अनुदानित असतांना शिक्षकांना अडी-अडचणीत मिळालेली मदत याबद्दल शिंदे सर यांनी माहिती दिली. 

अगदी कमी वेळेत या स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक खंडू खालकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सध्या बदलत्या शिक्षण पद्धतीत शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या असलेल्या गरजा, आवश्यक सुधारणा याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आपसात विचार विनिमय करून शाळा विकासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रगतीबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले. आपण लावलेली झाडे आज किती मोठी झालेली आहेत हे फार सुखावणारे असल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रसंगी या शाळेतून आपल्या नोकरीला सुरुवात केल्याच्या आठवणी हिरे मॅडम, अनिल पवार सर यांनी सांगितल्या, त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्नेह भोजन झाले. पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सर्वांनी निरोप घेतला.







Post a Comment

0 Comments