उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जगापूर फाट्यावर एका शेतामध्ये जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर जुगाऱ्यांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली असून यात एकूण अठरा जणांवर विविध कलमा अंतर्गत पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बावन्न पत्ता जुगार खेळणाऱ्या पैकी एकाला अटक केली असून उर्वरित संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि. ७ च्या रात्री १० च्या दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन पोफाळी पोलिसांना एका शेतामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस धाड टाकण्यासाठी शेतात गेले असता काही इसमांनी पोलिसांची कॉलर पकडून, शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिसांनाच शिवागिळ करून त्यांच्यावर दगडफेक केली, व तेथून पसार झाले. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली असून पंजाब ढोणे (वय ५५) राहणार ईसापुर धरण तालुका पुसद असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे यांनी तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी एकूण १८ आरोपीवर विविध कलमा नुसार गुन्हे दाखल केली आहेत. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर १७ आरोपींचा पोफळी पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
सदरील कार्यवाही यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता, पुसद येथील सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बि.जे. हर्षवर्धन यांना माहिती देवून तसेच उमरखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे लेखी आदेशाने सुनील मदने, शंकर टाळीकोटे, राहुल रोकडे, अजय गावंडे, सय्यद जुनेद अली, यांनी केली आहे.या कार्यवाही मध्ये १ लाख ८ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास ठाणेदार पंकज दाभाडे करीत आहे.
0 Comments