नांदगाव - मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहिदांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थितांचे वतीने मुख्याध्यापिका ज्योती काळे व पर्यवेक्षक अविनाश शेवाळे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने इयत्ता दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी संचालन केले.
कारगिल युद्धाची सुरुवात मे १९९९ मध्ये झाली, जेव्हा पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून कारगिल जिल्ह्यातील मोक्याच्या जागांवर कब्जा केला होता. या पाकिस्तानी घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय सैन्याने त्वरित दखल घेतली आणि "ऑपरेशन विजय" (Operation Vijay) सुरू केले.
भारतीय सैन्याने घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आणि भारतीय भूभाग परत मिळवण्यासाठी हे मोठे अभियान सुरू केले. यात सुमारे २,००,००० सैनिक सामील होते.भारतीय हवाई दलाने (IAF) जमिनीवरील सैन्याला मदत करण्यासाठी हवाई हल्ले सुरू केले. सुरुवातीला काही अडचणी आल्या असल्या तरी, नंतर हवाई दलाने अत्यंत प्रभावीपणे पाकिस्तानी बंकर्स, पुरवठा मार्ग आणि तटबंदींवर अचूक हल्ले केले.बोफोर्स तोफांच्या अचूक आणि प्रभावी माऱ्यामुळे उंच शिखरांवर असलेल्या शत्रूंना मोठे नुकसान पोहोचले. भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवला आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने आपला सर्व भूभाग परत मिळवला.
रक्षाबंधनच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी राख्या भरून पाठविल्या होत्या. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नेहमी देशाचा आणि आपल्या देशासाठी लढणाऱ्या जवानांचा आदर केला पाहिजे. सैनिक बांधवामुळेच आपला देश सुरक्षित आहे हे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments