उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरला आग ! सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

 Bay- team aavaj marathi 

 उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात चार महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या डायलिसिस सेवा केंद्रात काल सोमवारी दुपारी १:३० च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने एकदम धावपळ सुरू झाली.त्यामुळे डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपस्थित कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांनी वेळीच प्रसंगावधान राखत रुग्णांना बाहेर काढल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
आग लागताच  काही क्षणांतच संपूर्ण डायलिसिस कक्षात धूर पसरला. त्या वेळी उपचार सुरू असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसह उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये जीवाच्या भीतीने मोठी धांदल उडून धावपळ सुरू झाली.मागील चार महिन्यांपूर्वीच या रुग्णालयात शासनाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा केंद्र सुरू करण्यात आले. 

तालुक्यातील अनेक रुग्ण आठवड्यातून दोन वेळा, काही पंधरा दिवसांतून एकदा तर काही रुग्ण दररोज डायलिसिस साठी येथे येतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डायलिसिस सुरू असतानाच वीज वारंवार ये-जा होत असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार होती. आजही डायलिसिस सुरू असतानाच अचानक वीजपुरवठ्यातील बिघाड व वाढलेला लोड यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागताच काही उपस्थित कर्मचाऱ्यांनी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी तत्परतेने प्रसंगावधान राखून बाजूला असलेल्या आपत्कालीन खिडक्या व दरवाजे तोडून रुग्णांना त्वरित बाहेर काढले. 

या घटनेत सुदैवाने एकाही रुग्णाला गंभीर इजा झाली नाही; मात्र रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,मागील काही दिवसांपासून येथे वीजपुरवठा सातत्याने खंडित होने. तसेच विद्युत पुरवठा कमी किंवा जास्त दाबाने होत असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.


शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा केंद्र एचएलएल ( HLL ) कंपनीमार्फत चालविले जाते. मागील अनेक दिवसांपासून वीज वितरण कंपनीकडून वीज ये-जा होत असून, हाय व्होल्टेज व लो व्होल्टेजचा प्रकार सुरू आहे. रुग्णालयाकडे जनरेटर उपलब्ध असतानाही संबंधित कंपनीकडून त्याचा नियमित वापर केला जात नसल्याचे सांगण्यात येते. वारंवार पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आज ही गंभीर घटना घडली. आग लागल्यानंतर संपूर्ण कक्षात धूर पसरल्याने रुग्ण गोंधळून गेले होते. तांत्रिक कर्मचारी व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आपत्कालीन दरवाजे व खिडक्या उघडून रुग्णांना बाहेर काढले.

याबाबत स्पष्टीकरण देताना प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले की “आमच्याकडे जनरेटर उपलब्ध आहे. मात्र वीजपुरवठ्यातील हाय व्होल्टेज व लो व्होल्टेजमुळे वारंवार अडचणी येत आहेत. आज झालेल्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.”

डॉ. एस. पी. डोंगे
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड

Post a Comment

0 Comments