Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
उमरखेड शहरातील एका खून प्रकरणा मधील मागील सात महिन्यांपासून फरार असलेल्या एका मुख्य संशयित आरोपीला हैदराबाद मधून अटक करण्यात आली असून ही कारवाई सोमवार, दि. २९ डिसेंबर रोजी उमरखेड डी बी पथकाने केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे या गुन्ह्यातील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती.परंतु हा गुन्हा घडला तेव्हापासून संशयित फरार होता.
शेख जिशान शेख मिनाज २४ वर्षे, रा. ताजपुरा वॉर्ड, उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून ९ जून २०२५ रोजी उमरखेड येथील अब्दुल रहमान कॉलनीतील शेख खालीद शेख अकबर वय ३५ यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता सह भारतीय हत्यार कायदा आणि गंभीर स्वरूपाच्या मोक्का कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आठ संशयित आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. मात्र, शेख जिशान हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी डी बी पथकाला आदेश दिले होते.
पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि यवतमाळ सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला सोमवार, दिनांक २९ डिसेंबर दुपारी १२ वा.चे सुमारास हैद्राबाद येथुन गोपनिय माहीती मिळालेल्या ठिकाणी जावून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने त्यास ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केली. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सागर इंगळे, संघशिल टेंभरे, संदीप जाधव, पूजा भारस्कर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड करीत असून, पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, पाहिजे आरोपी, फरार आरोपी यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याबाबत पो. नि. शंकर पांचाळ यांनी डि बी पथकांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने फरार व पाहिजे आरोपी बाबत गोपनिय माहिती घेणे चालु होते.

0 Comments