एका माकडाने आईच्या कुशीत असलेल्या २० दिवसांच्या बाळाला खेचलं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत फेकलं. पण सुदैवानं हे बाळ वाचलं. ग्रामस्थांनी तत्परता दाखवली. गावातील एक नर्स देखील मदतीला धावली. त्यामुळे बाळाचा जीव वाचला. ही घटना छत्तीसगडच्या जांजगीर चांपामध्ये घडली माकडांच्या उच्छादाने एक हृदयद्रावक घटना या घटनेनं संपूर्ण गाव स्तब्ध झाले आहे.
नैला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिवनी गावात घटना घडली. गावात राहणाऱ्या अरविंद राठोड यांच्या पत्नीची २० दिवसांपूर्वी प्रसुती झाली. तिनं एका कन्येला जन्म दिला. याच बाळाला अरविंद यांची पत्नी कुशीत घेऊन जेवण भरवत होती. तितक्यात अचानक एक माकड आलं. या माकडानं आईच्या कुशीतून बाळाला खेचलं आणि तिथून पळ काढला.
बाळाला माकडाने पळवताच आईनं आरडाओरडा सुरु केला. तिचा आवाज ऐकून कुटुंब आणि ग्रामस्थ तिथे धावले. यानंतर माकड १० ते १५ मिनिटं इकडे तिकडे पळू लागलं. काही वेळानंतर माकडाच्या हातात ते बाळच नव्हतं, त्यामुळे सगळेच घाबरले. ग्रामस्थांनी बाळाचा शोध सुरु केला, त्यांची नजर एका विहिरीकडे गेली असता तिथे बाळ पाण्यावर तरंगत होतं. जवळपास १० मिनिटं चिमुरडी पाण्यात होती. तिच्या तोंडात पाणीदेखील गेलं. पण डायपरमुळे ती पूर्णपणे बुडाली नाही. डायपरमुळे बाळ पाण्यावर अलगद तरंगत राहिलं.
परिस्थितीचें गांभीर्य पाहता ग्रामस्थांनी बादलीच्या मदतीनं चिमुकलीला बाहेर काढलं. त्याचवेळी तिथे राजेश्वरी राठोड नावाची नर्स देखील होती. ती गावातील मंदिरात कथा ऐकायला आली होती. राजेश्वरी यांनी वेळ न दवडता बाळाला सीपीआर दिला. काही वेळातच बाळाचा श्वास पुन्हा सुरु झाला. राजेश्वरी यांनी बाळाला जीवदान दिलं. हा प्रकार पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे भरुन आले.
प्रथमोपचार केल्यानंतर बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर बाळाची प्रकृती स्थिर आहे. तिला कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गावात माकडांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रासले आहेत. माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
0 Comments