कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धनावर व्याख्यान संपन्न

 Bay- team aavaj marathi 

सुरेश नारायणे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नांदगाव चे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ए. मराठे, प्रा. निगळे, प्रा. दौड, प्रा. राठोड, समन्वयक प्रा. वाय. एस. वाघ तसेच मराठी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यानात प्रा. सुरेश नारायणे यांनी सांगितले की, भाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नसून ती विचार, भावना, संस्कृती, परंपरा, इतिहास व अस्मिता जपणारे प्रभावी साधन आहे. मराठी भाषेला भारत सरकारने दिलेला अभिजात भाषेचा दर्जा ही अभिमानाची बाब असून मराठीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे, असे त्यांनी नमूद केले.

मराठी भाषेतील अभंग, ओव्या, भारुडे, पोवाडे, संत साहित्य, शाहिरी परंपरा, लोककला तसेच विविध विषयांवरील कादंबऱ्या, कविता, नाटके व नाट्यछटा यांचा उल्लेख करत मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेने माणूसपण शिकवले असून समता, बंधुता, करुणा व न्यायाची बीजे समाजात पेरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेतील नऊ रस शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत यांतून मराठी भाषा प्रगट होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आज घराघरात इंग्रजीचा वाढता वापर, शाळांमध्ये मराठीला दुय्यम स्थान, मोबाईल व सोशल मीडियावर इंग्रजी व हिंदीचा अतिरेक तसेच मराठीत बोलणे म्हणजे मागासलेपणा ची समजूत या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.


मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे, नाटके, चित्रपट पाहणे तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीत बोलण्याचा आग्रह धरणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेचा भविष्यकाळ आजच्या पिढीच्या हातात असून मराठीत लिहा, बोला व सोशल मीडियावर मराठीतून मत व्यक्त करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. शिक्षक व पालकांनीही मराठी भाषेचा आग्रह धरावा, असे त्यांनी सांगितले. भाषा वाचली तर संस्कृती वाचेल, संस्कृती वाचली तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर देश वाचेल, असा संदेश देत मराठीचा दीप अखंड तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाय. एस. वाघ यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य प्रा. एस. ए. मराठे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन प्रा. वाघ यांनी केले.

Post a Comment

0 Comments