Bay- team aavaj marathi
नांदगाव शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या जतपूरा या वारली आदिवासी जमातीच्या वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जतपूरा,तालुका नांदगाव,जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांना भारतीय लोक कलेची ओळख करून देण्यासाठी वारली चित्रकलेचे विशेष धडे देण्यात आले. आधुनिक शिक्षणासोबतच पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन व्हावे,या उद्देशाने शाळेचे शिक्षक अमोल आढळकर सर यांनी हा उपक्रम राबवला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वारली या स्वतःच्या जमातीचा इतिहास माहित व्हावा.या उद्देशाने वारली कलेचे धडे देण्याचं काम सरांनी केलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, निरीक्षण शक्ती आणि सांस्कृतिक जाणीव वाढल्याचे शिक्षकांनी नमूद केले. लोक कलेतून शिकताना विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, सहकार्य आणि अभिव्यक्तीचा आत्मविश्वास निर्माण होत असल्याचेही जाणवले. वारली कलेचा इतिहास,आदिवासी जीवनशैली,निसर्गाशी असलेले नाते तसेच दैनंदिन जीवनातील प्रसंग चित्रांच्या माध्यमातून कसे मांडले जातात,याची माहिती देण्यात आली. ठिपके,रेषा व त्रिकोण यांच्या साहाय्याने चित्र रचना कशी केली जाते,याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले व विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
लोककलेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने असे उपक्रम उपयुक्त ठरत असून,विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख निर्माण होत असल्याचे मत सरांनी व्यक्त केले. या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी शेती,नृत्य,सण-उत्सव व ग्रामजीवन दर्शविणारी वारली चित्रे उत्साहाने साकारली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोककलेविषयी अभिमान निर्माण होत असून शाळेतील शिक्षण अधिक आनंददायी होत आहे.”या उपक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी दिलीप नाईकवाडे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी श्री. योगेश थोरात साहेब यांच्या सह सावतानगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संतोष भैरव सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती विद्या पाटील मॅडम व सहशिक्षक अमोल आढळकर सर उपस्थित होते.


0 Comments