लिंगभेद समानतेसाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक- प्रा. सविता हजारे

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड यवतमाळ 

मानवी जीवन हे अत्यंत सुंदर असून ते अधिक आनंदी व समाधानकारक करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि लिंगभेद समानता निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यवतमाळ येथील प्रा. सविता हजारे यांनी केले.

त्या विडूळ येथील उमा महेश्वर संस्थानात आयोजित शिवनाम सप्ताहातील प्रबोधन मालेत व्याख्यान देत होत्या. या व्याख्यान मालेतील तिसऱ्या पुष्पात त्यांनी “हे जीवन सुंदर आहे” या विषयावर प्रभावी व विचारप्रवर्तक विवेचन केले. प्रा. हजारे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले व महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा संदर्भ देत कर्म सिद्धांत, एकेश्वरवाद आणि सामाजिक समानतेचे महत्त्व अधोरेखित केले. सत्य, न्याय आणि सदाचार यांच्या आधारावरच माणूस आपल्या जीवनात ‘स्वर्ग’ निर्माण करू शकतो, यासाठी प्रत्येकाने जागरूकपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सभागृहात ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी यवतमाळ येथील माजी केंद्रप्रमुख कल्पना हजारे यांचीही उपस्थिती लाभली. या व्याख्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवनाम सप्ताहाच्या निमित्त सात दिवस विविध कीर्तनकार आणि नामवंत व्याख्याते यांची वैचारिक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमाचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उमा महेश्वर संस्थान, शिवनाम सप्ताह समिती, वीरशैव सेवा मंडळ, मन्मथ ज्योत यात्रा मंडळ व शिक्षण दृष्टी केंद्र, विडूळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments