बाराव्या शतकातील आद्य क्रांतिकारक वीरशैव लिंगायत धर्म संरक्षक,समतावादी चळवळीचे जनक, बाराव्या शतकातील अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रियांना समान अधिकार बहाल करणारे समाज सुधारक,जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९२१ वी जयंती उमरखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ, बँड पथक, महात्मा बसवेश्वरांचा जयघोष करणारा युवा वर्ग,पाऊली खेळणाऱ्या महिला, यामुळे बसव भक्ता मध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अनेकांनी अभिवादन केले.ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.शोभायात्रा महात्मा बसवेश्वर संस्थान, बसवलिंग स्वामी मठ, नाग चौक, छञपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक, खडकपुरा, शहीद चौक ,सराफा लाईन आठवडी बाजार मार्गे काढून शेवटी महात्मा बसवेश्वर संस्थान शिव मंदिरात विसर्जित करण्यात आली .
समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हे जाणून महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकातच विविध जाती धर्माचे लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांनी "अनुभव मंडप" ची स्थापना केली. अनुभव मंडप चा अर्थ अनुभवाची प्राप्ती करून देणारे स्थान, अशा या अनुभव मंडपातील शरण शरणीला आपले विचार निर्धास्तपणे मांडता येत असे. जणू त्या काळातील ती एक प्रकारची संसद च होती.
महात्मा बसवेश्वरांनी लोकांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले. 'श्रम हाच ईश्वर' हा मूलमंत्र त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांनी स्वानुभवातून लिहिलेली वचने भारतीय संविधानाचा गाभा आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, स्त्री- पुरुष समानता ही सर्व मूल्ये त्यांच्या समताधिष्ठित वाचनात दडलेली आहेत. देवाला प्रसन्न करायचे असेल तर चोरी करू नका, हत्या करू नका, खोटे बोलू नका, इतरांचा तिरस्कार करू नका, निंदा करू नका हीच अंतरंगशुद्धी व बहिरंगशुद्धी असून, कुडलसंगम देवाला प्रसन्न करण्याची रीत असल्याचे ते सांगायचे. सामाजिक समानतेच्या प्रसारासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना त्यांच्या जयंती निमित्त शोभायात्रा काढून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार श्री किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष सौ तेजश्रीताई जैन, महात्मा बसवेश्वर संस्थांचे अध्यक्ष संतोष माधवअप्पा हिंगमिरे, नगरसेवक गजानन तुकाराम रासकर, नगरसेविका सौ. लाहेवार, वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर पुजारी, पंचाक्षरी खडकेश्वर महाराज, आर्य वैश्य समाज यांच्यासह अनेक सेवाभावी संस्था व संघटनांकडून शोभायात्रेत महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले.तसेच नगरपरिषदेत सुध्दा महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी महात्मा बसवेश्वर संस्थानचे पदाधिकारी,वीरशैव लिंगायत समाज संघटना,वीरशैव लिंगायत महिला मंडळ, सर्व महिला भजनी मंडळ व युवा वर्ग यांनी विशेष सहकार्य केले.
0 Comments