Bay- team aavaj marathi

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (नांदेड)

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांवर यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट दाटले असून कोट्यवधीचा खर्च होऊनही मुरली जवळील नदीवर बांधलेला बंधारा मात्र कोरडा ठणठणीत आहे.नदी गावालगत असूनही गावकरी मात्र तहानेने व्याकुळ झालेले आहेत.कोरड्या पैनगंगा पात्रामुळे गुरा ढोरांचीही तडफड होत असल्याचे चित्र समोर येत आहे.या विपरीत परिस्थितीमुळे गावकऱ्यांचे डोळे मात्र वर्षानुवर्षे पाण्याने डबडबलेलेच आहेत.

उशाला नदी असूनही विदारक करणारी अशी परिस्थिती गावकऱ्यांची निर्माण झाली आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी प्रति "गंगामाय" सर्वांची जीवनदायिनी पैनगंगा आज पूर्णपणे कोरडीठाक पडली आहे. ज्या नदीने पिढ्यानपिढ्या गावांची तहान भागवली, तीच नदी आता वाळवंटासारखी ओसाड झालेली पाहून नागरिकांच्या डोळ्यांत पाणी तरळत आहेत.

सहस्त्रकुंड धबधब्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मुरली गावालगत २००६ साली माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू जाधव यांच्या पुढाकाराने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बंधारा आज पूर्णतः कोरडा आहे. या बंधाऱ्यात पाण्याचा नावालाही एक थेंबही नसल्याने शासनाच्या कामांबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ईसापुर धरणातून सोडले जाणारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत आहे.

लिंगी, देवरंगा, मंगरूळ, वाळकी, परोटी, इस्लापूर, मुरली आणि मुरली तांडा यांसह अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती सुरू आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायी चालावे लागत आहे. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे खोदून, ओलसर मातीतून थेंबथेंब पाणी गोळा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्या प्रत्येक थेंबामागे त्यांची झुंज, त्यांचा संघर्ष आणि जगण्याची धडपड दडलेली आहे.
या भागात पैनगंगा अभयारण्य असल्याने वन्य प्राण्यांचीही अवस्था अशीच दयनीय झाली आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यामुळे जंगली प्राणी तहानेने व्याकुळ होऊन मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची भीती वाढली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दुसरीकडे, जनावरांसाठी पाणी नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत.

सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधींची डोळेझाक होत असून या विभागातील खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे या गंभीर प्रश्नाकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पैनगंगा नदी अगदी जवळ असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणे ही अत्यंत वेदनादायक व शोकांतिका ठरत आहे.

नदीची भौगोलिक माहिती: 
ह्या नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेत असून तीचा प्रवास बुलढाणा, वाशीम, हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांतून वाहते. पुढे ती वर्धा नदीला मिळते, आणि नंतर प्राणहिता नदी म्हणून गोदावरीला मिळते.

प्रतिक्रिया 

पैनगंगा नदी जवळ असूनही आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. पुरुष, महिला आणि लहान मुलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जंगलातील वन्य प्राणी व जनावरं तहानेने तडफडत आहेत. शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा परिसरातील सर्व गावांतील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील.”

युवराज जाधव आणि इतर गावकरी 
 मुरली, तालुका उमरखेड