*पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग यांच्यावर नांदेड येथे प्राणघातक हल्ला बादल कुटुंबाचा पोलीस अधिकारी संतोष केंद्रें यांच्या धाडसामुळे वाचला जिव*

Bay- team aavaj marathi 

सौजन्य म.टा

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल गुरुवारी झालेल्या कृपाण हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली असून प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात हल्लेखोर जसपाल सिंग याला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बादल यांच्यासोबत असलेल्या ‘एसपीयू’चे निरीक्षक संतोष केंद्रे यांनी चपळाईने हल्लेखोराला रोखले. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या केंद्रे यांची बादल कुटुंबीयांनी विचारपूस करत चरणस्पर्श केले. तसेच त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

सुखबीर सिंग बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरतकौर बादल व त्यांच्या परिवारातील दोन सदस्य नांदेडमध्ये आले आहेत. येथील मुख्य गुरुद्वारात बादल परिवारातर्फे अखंड पाठ ठेवण्यात आला असून, त्याची सुरुवात बुधवारी सायंकाळनंतर झाली, तर शनिवारी या पाठाची समाप्ती होणार आहे. कृपाणाने हातावर हल्ला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीर सिंग बादल हे बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या संरक्षणासाठी मोठा बंदोबस्त होता. गुरुवारी बादल दर्शनासाठी नांदेड पासून जवळच असलेल्या ऐतिहासिक माता साहिब गुरुद्वारा येथे गेले होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास सहपरिवार दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच निहंगांची वस्त्रे परिधान केलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर कृपाणाने (छोटी तलवार) वार केला. बादल यांच्यावर गेल्या काही काळात झालेला हा दुसरा हल्ला आहे. चार डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्यावर सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वाराशी गोळीबार झाला होता.

पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या चपळाई मुळे वाचला जिव 

महाराष्ट्र पोलिसांच्या 'स्पेशल प्रोटेक्शन युनिट'चे (एसपीयू) निरीक्षक संतोष केंद्रे यांनी जेव्हा हल्लेखोराला हातात 'कृपाण' घेऊन पुढे येताना पाहिले, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्वरित त्या धोक्याचा सामना करण्यासाठी पुढाकार घेतला. निरीक्षक केंद्रे यांनी सुखबीर बादल आणि हल्लेखोर यांच्यामध्ये स्वतःला उभे करून एक मानवी ढाल तयार केली. हल्लेखोराला नियंत्रणात आणण्याच्या आणि सुखबीर बादल यांची सुरक्षा निश्चित करण्याच्या प्रयत्नात केंद्रें च्याही हाताला दुखापत झाली. दुखापत होऊन, रक्तस्त्राव होत असतानाही निरीक्षक केंद्रे मागे हटले नाहीत. उलट त्यांनी अत्यंत धैर्याने परिस्थिती हाताळली आणि सुखबीर सिंग बादल यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवले.

बादल कुटुंबाने केली कृतज्ञता व्यक्त 

हल्ल्यात जखमी झालेले निरीक्षक संतोष केंद्रे यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी एक अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. निरीक्षक संतोष केंद्रे यांची कर्तव्यनिष्ठा आणि शौर्य पाहून प्रभावित झालेल्या 'बादल' कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जाऊन त्या कुटुंबीयांनी निरीक्षक संतोष केंद्रे यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांचे आभार मानले. सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसीमरत कौर यांनी केंद्रेंना पाच लाख रुपयांची रोख रक्कमही देऊ केली, अशी माहिती मिळते. नांदेडमधील त्या घटनेनंतर निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बादल यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. पोलिसांनी हल्लेखोरास तेथेच ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली; पण सुरुवातीला त्याने आपले नाव व अन्य माहिती सांगण्यास नकार दिला. नंतर त्याला पोलिस बंदोबस्तात मुदखेड पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्लेखोराचे वय ५० ते ५५ दरम्यान असावे; तसेच तो नांदेड किंवा स्थानिक परिसरातला नव्हे तर बाहेरून आलेला असावा, असा अंदाज नांदेड पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.

या घटनेचा ‘अकाल तख्त’कडून निषेध

‘पवित्र स्थळी असा भ्याड हल्ला करणारी व्यक्ती शीख असूच शकत नाही,’ अशा शब्दांत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी कुलदीप सिंग गर्गज यांनी सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘अशा घटनेमुळे गुरुद्वाराचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि शीख समाजाची प्रतिमा मलिन होते. दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही शीखावर सच्चा शीख कधीही हल्ला करू शकत नाही,’असेही त्यांनी नमूद केले.शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते अर्शदीप सिंग क्लेर यांनी दिली. ‘पंथविरोधी’ शक्तिकडून हा कट रचला जात असल्याचा आरोप करून या कारस्थानामागे कोण आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते विर्सासिंग वल्तोहा यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments