अनुकंपा नोकरीसाठी मुलीने बापाला विष देऊन मारले प्रियकराने केला प्रताप उघड

 Bay- team aavaj marathi 

चंद्रपूर जिल्ह्यातून माणुसकीला आणि रक्ताच्या नात्यालाही काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या वडिलांच्या निधनानंतर मिळणाऱ्या 'अनुकंपा' तत्वावरील नोकरीच्या हव्यासापोटी एका मुलीनेच प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या पित्याला विष देऊन ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकेल अशा या थरारकांडाचा उलगडा खुद्द प्रियकरानेच सूडबुद्धीने केल्याने पोलीसही हादरून गेले आहे.

पोलीस खात्यात वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी एका मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढल्याची खळबळ जनक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. आर्या जयंत बाल्लावार वय २२ असे या पोलीस कन्येचे नाव असून, तिने २४ मार्च २०२३ रोजी वडील जयंत बाल्लावार यांना मिल्कशेक मधून विष देऊन त्यांची हत्या केली होती. विशेष म्हणजे, या खुनानंतर अवघ्या दोन महिन्यात ती वडिलांच्या जागी पोलीस दलात रुजू ही झाली. मात्र, वर्षभरानंतर प्रियकरानेच या साऱ्या कटाचे पुरावे पोलिसांच्या हवाली केल्याने हा खून करण्यात आला असल्याचे उघड झाले.

प्रियकराने दिलेल्या माहितीनुसार असा केला वडिलांचा खून 

आर्या बाल्लावार आणि तीचा बॉयफ्रेंड आशिष शेडमाके यांचे बालपणापासून प्रेमसंबंध होते. आशिष चे वडीलही पोलीस दलात होते. त्यांच्या निधनानंतर आशिष ला दोन महिन्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. हीच 'शॉर्टकट' आयडिया आर्या ने उचलली, तिचे वडीलही पोलीस दलात होते. तिने आशिष च्या मदतीने वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. २५ मार्च २०२३ रोजी आर्या हिने वडिलांना विषारी मिल्कशेक दिला. ड्युटीवर गेल्यावर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हा मृत्यू नैसर्गिक वाटला, पण तो एक सुनियोजित खून होता.

वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या तातडीने पोलीस दलात भरती झाली. आशिष आणि आर्या दोघांचे प्रशिक्षण एकत्र सुरू झाले. मात्र नियतीचा खेळ असा की, प्रशिक्षणावरून परतल्यानंतर आशिषला एका गंभीर गुन्ह्यात पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. आशिषची नोकरी जाताच आर्याने त्याच्याशी संबंध तोडले. स्वतःसाठी पित्याचा खून करायला लावणाऱ्या प्रेयसीने आपला अपमान केल्याचा राग आशिषला सहन झाला नाही. त्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून खुनाचे चित्रीकरण, मोबाईलवरील संभाषण आणि सर्व पुरावे सादर केले.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या पुराव्यांची दखल घेत तातडीने अटकेचे आदेश दिले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आर्या ने गुन्ह्याची कबुली दिली. रामनगर पोलीस ठाण्यात आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार आणि त्यांच्या साथीदाराच्या विरुद्ध ३०२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोटच्या मुलीने केवळ नोकरी साठी वडिलांना विष देऊन जीव घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.


Post a Comment

0 Comments